गर्भपातासाठी मिफेजीन: आपल्याला काय माहीत असला हवे

बाजारामध्ये अनेक प्रकारच्या विविध गर्भपाताच्या गोळ्या आहेत आणि त्यांची उपलब्धता जगभरात वेगळी आहे. या गोळ्यांमधील सर्वसामान्य गोळी मिफेजीन आहे. मिफेजीन कसे काम करते, तिची किंमत काय आहे, डोस काय आहे, ती कुठे मिळेल याबद्दल आपण जाणू इच्छित असल्यास, ही मार्गदर्शिका उपयुक्त ठरेल अशी आम्ही आशा करतो. आपल्याला अतिरिक्त प्रश्न असल्यास, कृपया आमच्या समुपदेशकांशी संपर्क साधा आणि आम्ही आपल्याला नक्कीच समर्थन देऊ.

मिफेजीन गर्भपाताची गोळी काय आहे?

मिफेजीन हा मिफेप्रिस्टोनचा ब्रॅंड आहे आणि ही 11 आठवड्यांपर्यंतच्या गर्भधारणांच्या गर्भपातासाठी वापरण्यात येणारी गोळी आहे. मिफेजीन गर्भाच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या गर्भधारणा हॉर्मोनला रोखते. मिफेजीन हे Exelgyn या फ्रेंच औषधोत्पादन कंपनीद्वारे उत्पादित केले जाते. [1], [4]

मिफेजीन गर्भपातासाठी कसे काम करते?

मिफेजीन प्रोजेस्टेरॉनचा परिणाम रोखते, जो गर्भाच्या वाढीसाठी आवश्यक असलेला एक नैसर्गिक गर्भधारणा हॉर्मोन आहे. यामुळे गर्भाची वाढ थांबते आणि हे गर्भाशयाला आकुंचण्यासाठी आणि गर्भाशय ग्रीवेला मऊ होऊन रुंद होण्यासाठी तयार करते. साधारणपणे, हे वापराच्या 24-48 तासांमध्ये काम करणे सुरू करेल. [2]

गर्भपातासाठी, मिफेजीन हे एका प्रोस्टाग्लॅंडिन औषधासोबत (जसे मिसोप्रोस्टॉल, सायटोटेक, मिसोट्रोल) घेण्यासाठी बनलेले आहे, जे गर्भाशय ग्रीवेला मऊ होऊन पसरण्यात आणि गर्भाशयाला आकुंचीत होण्यात मदत करेल. [1]

मिफेजीनचा डोस

मिफेजीन हे 200mg च्या गोळ्यांच्या स्वरुपात येते, ज्या 11 आठवड्यांखालील कोणत्याही गर्भधारणेसाठी शिफारस करण्यात येणारा डोस आहे. ती तोंडावाटे गिळली पाहिजे. मिफेजीन वापरल्यावर 24- 48 तास थांबून, त्यानंतर प्रोस्टाग्लॅंडिन औषध (मिसोप्रोस्टॉल, सायटोटेक, मिसोट्रोल) घ्यावे. [1], [2]

गर्भाच्या वयाच्या आधारावर प्रोस्टाग्लॅंडिन औषधाचा शिफारस करण्यात येणारा डोस बदलतो, अधिक माहितीसाठी शिफारस करण्यात येणारा प्रोटोकॉल येथे पहा.

9 आठवड्यांहून कमी गर्भधारणा असणार्‍या महिलांसाठी मिफेजीन आणि मिसोप्रोस्टॉलचा डोस: आपल्याला मिफेजीनची 1 आणि मिसोप्रोस्टॉलच्या 4 गोळ्यांची आवश्यकता असेल आणि मिसोप्रोस्टॉलच्या अतिरिक्त 4 गोळ्या (मिसोप्रोस्टॉलच्या एकूण 8 गोळ्या) घेण्याची शिफारस केली जाते.

9-11 आठवड्यांमधील गर्भधारणा असणार्‍या महिलांसाठी मिफेजीन आणि मिसोप्रोस्टॉलचा डोस: आपल्याला मिफेजीनची 1 आणि मिसोप्रोस्टॉलच्या किमान 4 गोळ्यांची आवश्यकता असेल, परंतु आपण 9-11 आठवड्यांदरम्यान गर्भवती असल्यामुळे मिसोप्रोस्टॉलच्या अतिरिक्त 4 गोळ्या घेण्याची तीव्र शिफारस केली जाते (मिसोप्रोस्टॉलच्या एकूण 8 गोळ्या). 8 गोळ्या मिळवणे कठीण असल्यास, आपण मिसोप्रोस्टॉलच्या केवळ 4 गोळ्या घेऊ शकता, पण त्यांचा प्रभाव कमी होईल.

मिफेजीनची किंमत

मिफेजीनची किंमत भौगोलिक स्थानानुसार बदलेल. वेगवेगळ्या देशांमध्ये गर्भपाताचे वेगवेगळे नियम असतात आणि यामुळे मिफेजीनच्या किंमतीवर परिणाम होऊ शकतो.

अशा संस्था आहेत ज्या दान म्हणून गोळ्या पाठवू शकतात, आपण मिफेजीन मिळवण्याबद्दल अधिक माहितीसाठी Women on Web आणि Women Help Women तपासू शकता. [4]

मिफेजीन कशी घ्यावी

safe2choose मिफेजीनची 1 गोळी (200mg) पाण्याबरोबर घेण्याची शिफारस करते. आपण मिफेजीन गोळी घेतल्यानंतर पहिल्या 30 मिनिटांमध्ये उल्टी केल्यास, असे होऊ शकते की गोळी काम करणार नाही आणि आपल्याला अजून एक गोळी घ्यावी लागेल.

मिफेजीन गोळी घेतल्यानंतर 24-48 तास थांबा आणि नंतर प्रोस्टाग्लॅंडिनचा शिफारस केलेला डोस घ्या.

गर्भाच्या वयाच्या आधारावर प्रोस्टाग्लॅंडिन औषधाच्या सूचना आणि डोस बदलतात, तपशील आणि प्रोटोकॉल येथे मिळेल.

मिफेजीनचे साइड इफेक्ट

मिफेजीन गर्भधारणेशी संबंधित मळमळ काही प्रमाणात वाढवू शकते आणि हे शक्य आहे की त्यामुळे पोटात कळा येऊ शकतील किंवा रक्तस्त्राव होऊ शकेल. साधारणपणे, मिफेजीन गोळीसह प्रोस्टाग्लॅंडिन औषध घेतल्यानंतरच पोटदुखी आणि रक्तस्त्राव होईल.

मिफेजीन गर्भपाताच्या गोळ्या कशा दिसतात?

मिफेजीन 200mg ची गोळी आहे. ही 11 mm व्यासाची फिकट पिवळी, दंडगोलाकार, बायकॉन्वेक्स गोळी आहे जिच्या एका भागावर “167 B” कोरलेले आहे. [2]

पॅकची साइज 1 गोळी, 3 गोळ्या, 15 गोळ्या किंवा 30 गोळ्या आहे. [4]

मिफेजीन गर्भपाताच्या गोळ्या कशा मिळवाव्यात

भौगोलिक स्थान आणि संबंधित गर्भपात कायदे किंवा निर्बंधांनुसार मिफेजीन गर्भपाताच्या गोळ्यांची उपलब्धता बदलते.

या देशांमध्ये मिफेजीन उपलब्ध आहे याची पडताळणी केलेली आहे: ऑस्ट्रीया, बेल्जियम, बल्गेरिया, आयव्हरी कोस्ट, डेन्मार्क, एस्टोनीया, फिनलँड, फ्रांस, जर्मनी, ग्रीस, इटली, नेदरलँडस, न्यूझीलंड, नॉर्वे, पोर्तुगल, रोमानिया, रशियन, फेडरेशन स्लोव्हेनिया, दक्षिण आफ्रिका, स्वीडन, ट्यूनिसिया, युनायटेड किंगडम. [4]

ही वेबसाइट आपल्या स्थानामध्ये मिफेजीनची उपलब्धता शोधण्यामध्ये देखील सहाय्यकारक ठरू शकते. [5]

आपण आमच्या समुपदेशकांशी देखील संपर्क साधू शकता, आणि ते आपल्याला आपल्या जवळपासच्या विश्वासू प्रदात्याशी संपर्क साधण्यासाठी मदत करतील.

लेखक:

by the safe2choose टीम आणि कॅराफेम मधील समर्थन देणार्‍या तज्ञांद्वारे, द नॅशनल अबॉर्शन फंड (NAF) यांच्या 2020 च्या शिफारसी आणि Ipas च्या 2019 च्या शिफारसींवर आधारित.

द नॅशनल अबॉर्शन फंड (NAF) ही उत्तर अमेरिकेतील गर्भपात सुविधा पुरवणार्‍या प्रदात्यांची व्यावसायिक संस्था आहे.

कॅराफेम एक सोयिस्कर आणि व्यावसायिक गर्भपात आणि कुटुंब नियोजन सेवा प्रदान करते ज्यामुळे लोक त्यांच्या मुलांची संख्या आणि त्यांच्यामधील अंतर नियंत्रित करू शकतात.

Ipas ही एकमेक अंतरराष्ट्रीय संस्था आहे जिचा एकमेव हेतु सुरक्षित गर्भपात आणि गर्भनिरोधक देखभालीची उपलब्धता वाढवणे आहे


स्त्रोत

[1] Exelgyn. Homepage. येथून मिळवली: https://www.exelgyn.com/

[2] https://www.medicines.org.uk/emc/medicine/617#INDICATIONS

[3] Ipas. (2019). पुनरुत्पादात्मक आरोग्यामधील क्लिनिकल अद्यतने. L. Castleman & N. Kapp (Eds.). Chapel Hill, NC: Ipas. येथून मिळवली: https://ipas.azureedge.net/files/CURHE19-april-ClinicalUpdatesInReproductiveHealth.pdf

[4] IPPF. वैद्यकीय वस्तूंचा डेटाबेस. येथून मिळवली: https://www.medab.org/advanced-search-multiple

[5] विमेन ऑन वेव्स. नकाशावरील देश. येथून मिळवली: https://www.womenonwaves.org/en/map/country

Last updated on 11/02/2021