क्लिनिकमधील गर्भपाताचे प्रकार

क्लिनिकमधील गर्भपाताचे वेगवेगळे प्रकार आहेत जे गर्भधारणेच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये केले जाऊ शकतात. या पृष्ठामध्ये प्रत्येक प्रक्रियेबद्दल तपशीलवार माहिती आहे.

क्लिनिकमधील गर्भपात काय आहे?

1/ क्लिनिकमधील गर्भपाताची परिभाषा

क्लिनिकमधील गर्भपात ही निवडक गर्भपातासाठी किंवा नैसर्गिक गर्भपाताच्या व्यवस्थापनासाठी एक सुरक्षित आणि 99% प्रभावी पद्धत आहे आणि ती एका प्रशिक्षित आरोग्यसेवा प्रदात्याद्वारे क्लिनिक किंवा हॉस्पिटलमध्ये करण्यात येते. [1]

प्रक्रियेदरम्यान क्लिनिशियन गर्भाशय ग्रीवेला हळूहळू उघडण्यासाठी (रुंद करण्यासाठी) उपकरणांचा वापर करतात आणि नंतर गर्भाशयातून गर्भ काढण्यासाठी अस्पिरेशन पद्धतीचा उपयोग करतात. महिलेला प्रक्रियेदरम्यान वेदना जाणवू शकतात आणि नंतर अधून मधून अनेक दिवस किंवा आठवडे काही रक्तस्त्राव होऊ शकतो. [2]

2/ क्लिनिकमधील गर्भपाताच्या वेगवेगळ्या पद्धती

क्लिनिकमधील गर्भपाताच्या अनेक सुरक्षित पद्धती आहेत ज्यांमधून आपण एक निवडू शकता आणि शक्यतो ते आपल्या गर्भाच्या वयावर अवलंबून असते. वेगवेगळ्या गर्भपात करण्याच्या पद्धतींसाठीच्या गर्भाच्या वयामध्ये काही प्रमाणात साम्य असल्यामुळे, निर्णय भौगोलिक स्थान, साधनांची उपलब्धता आणि प्रदात्याच्या आणि वैयक्तिक प्राधान्यावर सुद्धा अवलंबून असते. [1], [2]

 • मॅन्युअल वॅक्युम अस्पिरेशन (MVA) एक प्रकारचे गर्भाशयाचे अस्पिरेशन आहे आणि ते सामान्यतः गर्भधारणेच्या 14 आठवड्यांपर्यंत वापरले जाते
 • इलेक्ट्रिक वॅक्युम अस्पिरेशन (EVA) एक प्रकारचे गर्भाशयाचे अस्पिरेशन आहे आणि ते अनेकदा गर्भधारणेच्या 15 आठवड्यांपर्यंत वापरले जाते
 • डायलेशन आणि इवॅक्युएशन (D&E) पद्धती सामान्यतः गर्भधारणेच्या 14 आठवड्यांनंतर वापरल्या जातात
 • इंडक्शन गर्भपात, वापरला जातो तेव्हा, सामान्यतः गर्भधारणेच्या 16 आठवड्यांनंतर वापरला जातो
 • डायलेशन आणि क्युरेटेज (D&C) ही गर्भपाताची जुनी झालेली पद्धत आहे आणि बर्‍याच ठिकाणी गर्भाशयाचे वॅक्युम अस्पिरेशन आणि डायलेशन आणि इवॅक्युएशन (D&E) सह बदलण्यात येत आहे.

safe2choose पहिल्या तिमाहीमध्ये किंवा दुसर्‍या तिमाहीच्या सुरुवातीमध्ये असलेल्या गर्भधारणांसाठी मॅन्युअल वॅक्युम अस्पिरेशन (MVA) गर्भपाताची किंवा इलेक्ट्रिक वॅक्युम अस्पिरेशन (EVA) गर्भपाताची शिफारस करते आणि या पद्धतींबद्दल तपशीलवार माहिती येथे देते.

3/ क्लिनिकमधील गर्भपातामध्ये एनेस्थीशियाचा वापर

क्लिनिकमधील गर्भपातासाठी वापरल्या जाणार्‍या एनेस्थीशियाचे अनेक प्रकार आहेत आणि कोणती पद्धत वापरायची हे खूपदा गर्भाचे वय तसेच एनेस्थीटिक एजेंटच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. संभाव्य एनेस्थीशियाच्या पद्धतींमध्ये सामील आहेत [3]:

 • लोकल एनेस्थीटिक: हे क्लिनिकमधील गर्भपातामध्ये वापरण्यात येणारे एक खूप सामान्य एनेस्थीटिक आहे. हे गर्भाशय ग्रीवेजवळ इंजेक्ट करण्यात येणारे एक संवेदना मंद करणारे औषध आहे ज्यामुळे प्रक्रियेदरम्यान त्रास कमी होतो. महिला जागी आणि पूर्णपणे सतर्क असते.
 • मध्यम/जागरूक उपशमन: हे थेट नसेमध्ये दिले जाणारे एनेस्थीटिक आहे आणि हे महिलेची जागृतावस्था किंचित कमी करते. ती तोंडी दिलेल्या सूचनांना प्रतिसाद देईल.
 • तीव्र उपशमन: हे थेट नसेमध्ये दिले जाणारे एनेस्थीटिक आहे आणि हे महिलेची जागृतावस्था खूप प्रमाणात कमी करते. ती अनेकदा तोंडी दिलेल्या सूचनांना प्रतिसाद देईल.
 • जनरल एनेस्थीशिया: यामध्ये इनहेल्ड किंवा इंजेक्टेड एनेस्थीटिक एजेंटचा मेळ वापरला जाऊ शकतो आणि यामध्ये महिला बेशुद्ध होते. ती तोंडी दिलेल्या सूचनांना प्रतिसाद देणार नाही.

मॅन्युअल वॅक्युम अस्पिरेशन (MVA) गर्भपात काय आहे?

मॅन्युअल वॅक्युम अस्पिरेशन (MVA) ही पहिल्या त्रैमासातील आणि/किंवा दुसर्‍या त्रैमासाच्या सुरुवातीपासून गर्भधारणेच्या 14 आठवड्यांपर्यंत गर्भपात करण्याची एक खूप सुरक्षित पद्धत आहे[2]. MVA साठी गर्भधारणेच्या वयाची मर्यादा अनेकदा क्लिनिक तसेच प्रक्रिया करणार्‍या आरोग्यसेवा प्रदात्यावर अवलंबून असते.

MVA हे क्लिनिकमध्ये एका प्रशिक्षित प्रदात्याद्वारे केले जाते.

प्रक्रियेदरम्यान गर्भाशयातून गर्भ काढण्यासाठी क्लिनिशियन सायलंट सक्शन डिव्हाइससह इतर उपकरणे वापरतात [2]. सामान्यतः ही प्रक्रिया महिला जागी असताना लोकल एनेस्थीशिया देऊन करतात आणि याला साधारणपणे 5 ते 10 मिनिटे लागतात. महिलेला प्रक्रियेदरम्यान वेदना जाणवू शकतात आणि नंतर अधून मधून अनेक दिवस किंवा आठवडे काही रक्तस्त्राव होऊ शकतो. अधिक तपशील येथे मिळू शकतात.

इलेक्ट्रिक वॅक्युम अस्पिरेशन (EVA) गर्भपात काय आहे?

इलेक्ट्रिक वॅक्युम अस्पिरेशन (EVA) ही एक खूप सुरक्षित आणि मॅन्युअल वॅक्युम अस्पिरेशन (MVA)शी जुळणारी पद्धत आहे. EVA गर्भधारणेच्या पहिल्या त्रैमासिक काळात आणि/किंवा दुसर्‍या त्रैमासिक काळाच्या सुरूवातीला वापरली जाऊ शकते. EVA हे क्लिनिकमध्ये एका प्रशिक्षित प्रदात्याद्वारे केले जाते.

प्रक्रियेदरम्यान गर्भाशयातून गर्भ काढण्यासाठी क्लिनिशियन इलेक्ट्रिक वॅक्युम सक्शनसह इतर उपकरणे वापरतात.

EVA आणि MVA मधील मुख्य फरक हा आहे की गर्भ काढण्यासाठी सक्शन म्हणून इलेक्ट्रिसिटी वापरली जाते. EVA साठी इलेक्ट्रिसिटी आवश्यक असल्याने, ती कदाचित कमी साधने असलेल्या ठिकाणी उपलब्ध असणार नाही. जिथे उपलब्ध असेल तिथे, 10- 12 आठवड्यांनी गर्भाचे वय वाढत असल्यामुळे क्लिनिशियन ही EVA ची पद्धत वापरू शकतात कारण यामुळे त्यांना ही प्रक्रिया MVA पेक्षा जास्त जलद करता येते आणि त्यामुळे महिलेसाठी प्रक्रियेचा वेळ कमी होतो. अजून एक महत्त्वाचा फरक म्हणजे EVA यंत्र इलेक्ट्रिसिटी वापरत असल्यामुळे त्याचा आवाज होतो. [2]

डायलेशन आणि इवॅक्युएशन (D&E) गर्भपात काय आहे?

डायलेशन आणि इवॅक्युएशन (D&E) गर्भधारणेच्या साधारणतः 14 आठवड्यांनंतर वापरण्यात येणारी गर्भपाताची एक सुरक्षित पद्धत आहे. D&E ची उपलब्धता जगभरातील विविध स्थानांमध्ये असणार्‍या गर्भपाताबाबतच्या कायदे आणि निर्बंधांवर अवलंबून आहे. काही ठिकाणी D&E त्या महिलांसाठी उपलब्ध असू शकते ज्यांना काहीही कारणासाठी गर्भपात करायचा असतो किंवा अशा महिलांपूर्ते मर्यादित असू शकते ज्यांना खूप विशिष्ट स्वास्थ्य कारणांसाठी गर्भपात करायचा असतो. स्थानानुसार गर्भपातावरील निर्बंधांबद्दल माहिती येथे मिळेल.

D&E साठी, डायलेशन होण्यास मदत करणारे एजेंट वापरुन गर्भाशय ग्रीवा मऊ केली जाते. हे एजेंट बरेचदा प्रक्रियेच्या अनेक तास किंवा अनेक दिवस आधी सुद्धा दिले जातात. त्या नंतर प्रशिक्षित क्लिनिशियन गर्भ काढण्यासाठी अनेक साधनांचा आणि इलेक्ट्रिक वॅक्युम अस्पिरेशनचा (EVA) मेळ वापरतात. प्रक्रियेदरम्यान अल्ट्रासाऊंड वापरली जाऊ शकते. गर्भाच्या वयानुसार, प्रक्रियेदरम्यान महिलेचा त्रास कमी करण्यासाठी लोकल एनेस्थीटिक आणि/किंवा उपशामक औषधांचा वापर केला जाऊ शकतो. [2], [3]

डायलेशन आणि क्युरेटेज (D&C) गर्भपात काय आहे?

डायलेशन आणि क्युरेटेज (D&C) ही सर्जिकल गर्भपाताची जुनी झालेली पद्धत आहे जी बरेच ठिकाणी वॅक्युम अस्पिरेशन गर्भपात पद्धतींसह बदलण्यात येत आहे. या पद्धतीची आता शिफारस केली जात नाही.

D&C दरम्यान, गर्भाशय ग्रीवा रुंद केली जाते आणि त्यानंतर गर्भाशयाचा पृष्ठभाग खरवडण्यासाठी धारदार क्युरेटचा वापर केला जातो. वॅक्युम अस्पिरेशनच्या तुलनेत, D&C ची प्रक्रिया करताना जास्त वेदना होण्याचा आणि गंभीर परिस्थिति निर्माण होण्याचा जास्त धोका असतो. या कारणासाठी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाइझेशन (WHO) ही शिफारस करते की शक्य असेल तेव्हा D&C ऐवजी वॅक्युम अस्पिरेशन गर्भपात, D&E किंवा गोळ्यांद्वारे गर्भपात करण्यात यावा. [2], [3]

इंडक्शन गर्भपात काय आहे?

उपलब्ध असेल तिथे, इंडक्शन गर्भपात ही गर्भधारणेच्या दुसर्‍या किंवा तिसर्‍या तिमाहीमध्ये (सामान्यतः 16 आठवडे किंवा अधिक) केली जाणारी पद्धत आहे. काहीवेळा इंडक्शन गर्भपात हा निवडक गर्भपातासाठी पर्याय असतो पण बहुतेक वेळा ते तेव्हा वापरले जाते जेव्हा आई किंवा गर्भासाठी आरोग्याच्या समस्या निर्माण होतात आणि गर्भधारणा संपवणे हा सर्वात सुरक्षित मार्ग असतो. याचे संकेत भौगोलिक स्थान आणि संबंधित कायदे आणि निर्बंधांवर बर्‍याच अंशी बदलतात.

ही पद्धत प्रसूतीचे अनुकरण करून, गर्भ बाहेर काढण्यासाठी गर्भाशय ग्रीवा रुंद करण्यासाठी आणि गर्भाशय आकुंचीत करण्यासाठी औषधांचा वापर करते. गर्भपाताची ही प्रक्रिया गर्भधारणेच्या नंतरच्या टप्प्यांमध्ये होत असल्यामुळे, ती नेहमी क्लिनिक किंवा हॉस्पिटलमध्ये केली जाते जेणेकरून प्रक्रिया होईपर्यंत महिलेचे निरीक्षण केले जाईल. सामान्यतः, यासाठी सर्जिकल साधनांची गरज भासत नाही, पण सर्जिकल हस्तक्षेपाची गरज पडल्यास, ते नेहमी उपलब्ध असते. नंतरच्या टप्प्यांमध्ये होणार्‍या गर्भपाताची ही पद्धत D&E पेक्षा दुर्गम आहे कारण बरेचदा ती पूर्ण होण्यासाठी खूप वेळ लागतो. [2]

क्लिनिकमधील गर्भपात करण्यास किती खर्च येतो?

क्लिनिकमधील गर्भपाताची किंमत यानुसार खूप बदलते: भौगोलिक स्थान, गर्भपातासाठी साधनांची उपलब्धता, गर्भपात करण्याचे स्थान (क्लिनिक किंवा हॉस्पिटल) आणि गर्भाचे वय.

क्लिनिकमधील गर्भपात सुरक्षित असतात का?

प्रशिक्षित क्लिनिशियनद्वारे केल्यावर क्लिनिकमधील गर्भपात खूप सुरक्षित असतो. सक्शन आणि सर्जिकल गर्भपात सेवा प्रदान करणार्‍या क्लिनिकनी स्थानिक संस्थेनी कायम केलेली मानके आणि मार्गदर्शकतत्त्वे आणि/किंवा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाइझेशन (WHO) द्वारे सुरक्षित गर्भपातासाठी दिलेल्या शिफारसी पाळल्या पाहिजेत. [2]

या मार्गदर्शकतत्त्वांमध्ये खालील बाबी सामील असल्या पाहिजेत (पण मर्यादित नाही):

 • गर्भपात कोण करू शकते
 • औषधांचे व्यवस्थापन
 • उपकरण साफ करणे
 • बायोमेडिकल कचर्‍याचे व्यवस्थापन
 • आरोग्यसेवा प्रदात्यांचे प्रशिक्षण आणि कार्यप्रदर्शन
 • इत्यादि.

क्लिनिकमधील गर्भपात करू इच्छिणार्‍या महिलांनी याची खात्री करावी की त्यांनी निवडलेली जागा गर्भपाताच्या सुरक्षित, मान्यताप्राप्त पद्धती वापरत आहे.

क्लिनिकमधील गर्भपात साधारण 99% प्रभावी असतो. [1]

क्लिनिकमधील गर्भपाताचे संभाव्य धोके आणि गंभीर परिस्थिति काय आहेत?

क्लिनिकमधील गर्भपात खूप सुरक्षित असला तरीही, या प्रक्रियेमध्ये काही धोके देखील आहेत ज्यामध्ये समाविष्ट आहेत: अति रक्तस्त्राव, संसर्ग, गर्भाशय आणि आजूबाजूच्या भागास इजा, अपूर्ण गर्भपात, गर्भधारणा कायम राहणे आणि मृत्यू.

जेव्हा प्रक्रिया एका प्रशिक्षित क्लिनिशियन द्वारे केली जाते तेव्हा हे धोके खूप कमी प्रमाणात असतात, पण सर्जिकल किंवा सक्शन गर्भपातासाठी संमती देत असताना ते माहीत असणे खूप महत्त्वाचे आहे. [2]

क्लिनिकमधील गर्भपाताचे साइड इफेक्ट काय आहेत?

क्लिनिकमधील गर्भपात प्रक्रियेच्या सर्व पद्धतींमध्ये शक्यतो महिलेला प्रक्रियेदरम्यान तीव्र वेदना जाणवतात. अनेकदा या कळा नंतर त्वरित कमी होतात, पण काही महिलांना काही दिवस किंवा आठवडे अधूनमधून कळा येऊ शकतात.

सक्शन आणि सर्जिकल गर्भपातांसाठी अनेकदा लोकल एनेस्थीशिया वापरला जातो आणि यामुळे प्रक्रियेदरम्यान गर्भाशय ग्रीवेच्या आजूबाजूचा भाग संवेदनाशून्य होऊन वेदना काही प्रमाणात कमी होतात. [2]

बहुतेक महिलांना क्लिनिकमधील गर्भपातादरम्यान आणि नंतर रक्तस्त्राव आणि पोटदुखी जाणवेल. सर्जिकल, गर्भपातानंतर अनेक प्रकारच्या भावना निर्माण होणे सामान्य आहे आणि ते योग्य आहे आणि जर महिलेला असे वाटत असेल की तिला अतिरिक्त मदतीची गरज आहे तर तिने समुपदेशन सेवा शोधली पाहिजे. [2]

क्लिनिकमधील गर्भपात वेदनादायक असतो का?

वॅक्युम आणि सर्जिकल गर्भपातांसह जोडलेली सर्वात सामान्य वेदना आहे प्रक्रियेदरम्यान महिलेला जाणवणार्‍या तीव्र कळा. अनेकदा या कळा नंतर त्वरित कमी होतात, पण काही महिलांना काही दिवस किंवा आठवडे अधूनमधून कळा येऊ शकतात. वेदनेची तीव्रता अनेकदा गर्भाचे वय तसेच प्रत्येक महिलेच्या सहनशक्तिवर अवलंबून असते, कारण प्रत्येकाला वेदना थोडी वेगळेपणाने जाणवते. [2]

क्लिनिकमधील गर्भपाता नंतर घ्यायची काळजी आणि गर्भनिरोधन

एका क्लिनिकमधील सर्जिकल गर्भपातानंतर, महिलांना अनेकदा एक फॉलो-अप भेट देऊ केली जाते, आणि तिची गरज नसली तरीही, प्रत्येक महिलेने तिच्या आरोग्य सेवा प्रदात्याच्या शिफारसीचा विचार करावा.

विशिष्ट कार्ये करण्यासाठी महिलेने थांबावे अशी वैद्यकीयरित्या सिद्ध झालेली कोणतीही वेळमर्यादा नाही जसे शॉवर/आंघोळ समवेत व्यायाम, शारीरिक संबंध किंवा टॅम्पॉन वापरण्यासाठी. साधारणपणे, प्रक्रियेनंतर किमान रक्तस्त्राव कमी होईपर्यंत महिलेने,आपल्या योनीमध्ये टॅम्पॉन आणि मेन्स्टृअल कप सारख्या गोष्टी घालणे आणि तीव्र शारीरिक क्रियाकलाप करणे टाळावे अशी शिफारस केली जाते. प्रत्येक महिला सहन होईल त्याप्रमाणे तिचे नित्य क्रियाकलाप करणे पुन्हा सुरू करू शकते आणि प्रत्येक महिला वेगळी असेल.

क्लिनिकमधून निघण्याआधी, महिलांना गर्भनिरोधक पद्धतींबद्दल माहिती दिली पाहिजे. गर्भनिरोधनाचे बरेच प्रकार लगेच सुरू केले जाऊ शकतात, परंतु, प्रत्येक महिला आणि तिच्या निवडीच्या पद्धतीबद्दल चर्चा झाली पाहिजे. गर्भपातानंतर महिलांना प्रश्न किंवा समस्या असू शकतात त्यामुळे क्लिनिकनी त्यांना संपर्क माहिती पुरवावी. [2]

महिलांनी मेडिकल सहाय्य घेतले पाहिजे अशा कारणांमध्ये समाविष्ट आहेत:

 • अति रक्तस्त्राव (सलग 2 किंवा अधिक तास, दर तासाला 2 पॅड संपूर्णपणे भिजत असतील)
 • प्रक्रियेनंतर 24 तासांपेक्षा जास्त काळ ताप (>38C किंवा 100.4F) येत असेल
 • वाढत जाणार्‍या तीव्र ओटीपोटाच्या वेदना
 • गर्भधारणेची लक्षणे कायम राहणे (वाढती मळमळ, स्तन नाजुक होणे, इत्यादि) [2]

आपल्या निवडीची योग्य गर्भनिरोधक पद्धत निवडण्यासाठी, https://findmymethod.org/ ला भेट द्या

लेखक:

safe2choose टीम आणि कॅराफेम मधील समर्थन देणार्‍या तज्ञांद्वारे, Ipas यांच्या 2019 च्या शिफारसी आणि WHO च्या 2012 च्या शिफारसींवर आधारित.

कॅराफेम एक सोयिस्कर आणि व्यावसायिक गर्भपात आणि कुटुंब नियोजन सेवा प्रदान करते ज्यामुळे लोक त्यांच्या मुलांची संख्या आणि त्यांच्यामधील अंतर नियंत्रित करू शकतात.

Ipas ही एकमेव अंतरराष्ट्रीय संस्था आहे जिचा एकमेव हेतु सुरक्षित गर्भपात आणि गर्भनिरोधक देखभालीची उपलब्धता वाढवणे आहे .

WHO ही संयुक्त राष्ट्रांची एक विशिष्ट एजन्सि आहे जी जागतिक सार्वजनिक आरोग्यासाठी जबाबदार आहे.


Sources

[1] Weitz, T. A., Taylor, D., Desai, S., Upadhyay, U. D., Waldman, J., Battistelli, M. F., & Drey, E. A. (2013). कॅलिफोर्निया लीगल वेवर अंतर्गत व्यावसायिक नर्स, प्रमाणित नर्स दाई आणि फिझीशियन सहाय्यक यांच्याद्वारे करण्यात येणार्‍या अस्पिरेशन गर्भपाताची सुरक्षितता. अमेरिकन जर्नल ऑफ पब्लिक हेल्थ, 103(3), 454-461. येथून मिळवली: https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC3673521/

[2] वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाइझेशन (WHO). सुरक्षित गर्भपात: स्वास्थ्य प्रणाल्यांसाठी तांत्रिक आणि धोरण मार्गदर्शक, दुसरी आवृत्ती. 2012. येथून मिळवली: https://apps.who.int/iris/bitstream/handle/10665/70914/9789241548434_eng.pdf;jsessionid=F77B761669FC579124C1E9CA2CC3CFDB?sequence=1

[3] Ipas. पुनरुत्पादात्मक आरोग्यामधील क्लिनिकल अद्यतने. 2019. येथून मिळवली: https://ipas.azureedge.net/files/CURHE19-april-ClinicalUpdatesInReproductiveHealth.pdf

Last updated on 09/02/2021